विराट शक्ती प्रदर्शनात सत्यजित पाटणकर यांचा अर्ज दाखल.
१९८३ची पुनरावृत्ती होत सत्यजित आमदार होणार – विक्रमसिंह पाटणकर.
पाटण दि. २८ ( प्रतिनिधी ) सर्वसामान्य जनता ज्यावेळी निवडणूक आपल्या हातात घेते, संघर्ष करते आणि सत्ताधाऱ्यांचे गद्दारी, मलिदा, टक्केवारी, कमिशन हुकूमशाहीचे राजकारण उध्वस्त करण्यासाठी समोर येते त्यावेळी विजय हा नैतिकतेचा होतो. आणि यातूनच चांगल्या उमेदवाराचाच होतो, १९८३ साली माझ्या बाबतीत जे घडलं तेच आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाबतही घडणार असून २३ नोव्हेंबरला सत्यजितसिंह पाटणकर हेच पाटण विधानसभेचे आमदार होतील आणि तुम्हा आम्हा सर्वांचेच स्वप्न साकार होत हुकूमशाहीतून पाटणची कायमची सुटका होईल असा विश्वास माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.
सत्यजितसिंह पाटणकर यांनी विराट शक्ती प्रदर्शन करत पाटण येथे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, माजी जि. प. शिक्षण सभापती राजेश पवार, योगेश पाटणकर, रमेश मोरे, निवासराव पाटील, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण, अमरसिंह पाटणकर, नितीन पाटील, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी विक्री संघ चेअरमन अविनाश जानुगडे, तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, आबासाहेब भोळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले हल्ली राजकारण घाणेरडं बनलं किंवा बिघडलं आहे अशा सगळ्यांचीच तक्रार असते, मात्र जर आपणच चांगले उमेदवार निवडून नाही दिले तर हीच वेळ आपल्यावर येते. त्यामुळे आता पक्ष कोणता याही पेक्षा व्यक्ती कोणती बघा संस्कार, चारित्र्य, कर्तृत्व आणि समाजासाठीचे योगदान हे बघा. दहा वर्षात पाटण मतदारसंघ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. ज्यांनी विकास थांबवला त्यांना आता जाब विचारा, आणि नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा उर्वरित वीस दिवसात तुमचा हक्काचा आमदार करा आणि आपल्या सर्वांचं आदर्श भवितव्य घडवा. प्रत्येक मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचा, मतदारांना दडपण, आमिष येतील मात्र त्यांना एक सांगा गुप्त मतदान असल्याने कोणालाही घाबरायचं कारण नाही. आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या, विजय आपलाच आहे अपक्ष म्हणून चिन्ह काय ते येणाऱ्या काळात कळेल पण प्रत्येक जण मीच उमेदवार या भावनेने कार्यरत राहिला तर निश्चित विजयाचा गुलाल आपल्याच अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले ज्यांच्याशी निष्ठेने वागलो त्यांच्याकडून भलेही अन्याय झाला असला तरी माझी तमाम जनता मला न्याय दिल्याशिवाय आता शांत बसणार नाही. खोके, भ्रष्टाचार, मलिदा,टक्केवारी, कमिशन, बार दारूची दुकाने, गद्दारी, बेरोजगारी, सत्तेची मस्ती, पैसा अशा अपपप्रवृत्तीं विरोधात आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे. समोरचा उमेदवार आपल्यासाठी बंदूक ठासून उभा आहे आणि शिकार करणार असं जरी सांगत असेल तरी देखील शिकार करणे हा आपला धर्म आहे. आता तर माझ्या हजारो बंधू-भगिनींनी गद्दारांची शिकार करण्याचा निर्धार केला असून हा जोश बघितल्यानंतर समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वाभिमानाचा बार कधीही फुसका जात नाही त्यामुळे आता शिकार्याचीच शिकार केल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. आपल्याला मिळणारी सहानुभूती, वैचारिक पाठिंबा लक्षात घेता या मंडळींनी पैसे वाटायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केल्याच्या चर्चा आहेत. आपल्याच खिशात हात घालून मिळवलेला पैसा, मलिदा गॅंगच्या माध्यमातून टक्केवारी, कमिशन, बुरशीचे लाडू, साखर, पैसे, टी-शर्ट, पेढे आदी अमिषं वाटली जात असतील वेळप्रसंगी पैसा घ्या कारण तो त्यांच्या हरामीचा पैसा आहे. त्यांनी आता वाट्टेल की आमिष देत दबाव, दडपण आणले तरीही स्वाभिमानाचा गुलाल आपलाच झाला पाहिजे याची खूणगाठ बाळगा. इथून जाताना एकच लक्षात घ्या तुम्हीच सत्यजित, तुम्हीच उमेदवार आणि तुम्हीच उद्याचे आमदार या भावनेने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा. फाजील आत्मविश्वास नको, रात्रीचा दिवस करा २२ दिवसात नव्याने मतदार संघ पिंजून काढा. मी पाच वर्षे तुमच्या पाठीशी रात्रंदिवस राहीन याची खात्री देतो. निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्याने आपापसातील राजकारण, भांडण, मतभेद, नाराजी विसरा. पुढचा काळ आपलाच आहे त्यामुळे प्रत्येकाशी संवाद साधा, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्याचा प्रचार होईल मात्र आपल्याच खिशातून त्यांनी हजारो रुपये काढलेत याचाही विचार पोहोचवा. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या चुरशीने मतदान होते तीच चुरस या निवडणुकीतही दाखवा. हीच वेळ आहे या गद्दारांना उलथून लावण्याची त्यामुळे १९८३ प्रमाणेच स्वाभिमानी जनता येथे क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पाठीशी टायगर अभी जिंदा है हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या भूमिका चोख पार पाडा.
हिंदुराव पाटील म्हणाले राज्यात चुकीचं शासन कार्यरत असून यात थेट आमदारच आपल्यावर किती गुन्हे आहेत हे सभागृहात सांगतात त्यामुळे हे राज्य लोकप्रतिनिधींच आहे की गुन्हेगारांचं हाच प्रश्न पडतो. पाटण तालुका मागच्या काही वर्षात अतिशय चुकीच्या वळणावर गेलाय. आमच्या राजकीय कारकीर्दीत पंचवीस वर्षात रस्ते, सार्वजनिक विकास काम दर्जेदार झाली मुख्यमंत्री पदाच्या काळात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली काम वर्षानुवर्षे चांगल्या अवस्थेत आहेत मात्र या महाभागाने केलेली काम अवघ्या सहा महिन्यात उध्वस्त होतात. ठेकेदारी, कमिशन यात अडकलेला हा तालुका आता बाहेर काढला पाहिजे. यांचा सरपंच ठेकेदार होतो आणि ठेकेदार पुन्हा सरपंच होतो मग लोकांनी चांगल्या कामाची अपेक्षा कु
कोणाकडून करायची हा देखील प्रश्न आहे. सर्वसामान्य जनतेला कर्जबाजारी करणाऱ्या या सरकारला आता धडा शिकवलाच पाहिजे आणि तो धडा शिकवताना सत्यजितचा पाटणकरांसारखा उमेदवार पक्ष, आघाडी हे सर्व बाजूला ठेवून एक चांगला आमदार पाटणला निवडून देण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकात सांगली पॅटर्न राबवूया. आमिषं, पैसा, बदनामी, लाचारीने एक-दोन दिवसाची गरज भागेल पण पुन्हा पाच वर्ष आपण पाठीमागे जाणार आहोत याचा विचार करा. विध्वंसक हुकूमशाही व उध्वस्त करणारे उद्दाम नेतृत्व आता कायमचा हटवण्याची आपल्याला संधी मिळालीआहे त्या संधीचे सोने करत आपण सत्यजित पाटणकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आमदार करूयात असा विश्वास हिंदुराव पाटील यांनी व्यक्त केला.
स्वागत पाटण दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, प्रास्ताविक माजी सभापती राजाभाऊ शेलार तर आभार प्रदर्शन सचिन जाधव यांनी केले. यावेळी सौ. सुवर्णा सूर्यवंशी, मनोहर यादव ,अजित काळे, दयानंद शिलवंत, विश्वजीत पाटणकर, निवास पाटील, शंकर शेडगे, सोपानराव चव्हाण आदी मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी सौ. स्नेहल जाधव, रेखाताई पाटील, श्रीमती पुष्पाताई जाधव, दिनकरराव घाडगे, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने तरुण वर्ग उपस्थित होते.
सकाळी सत्यजितसिंह पाटणकर यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. यशस्विनीदेवी पाटणकर यांनी औक्षण केले. यावेळी विक्रमसिंह पाटणकर, अमरसिंह पाटणकर, सौ.शिलादेवी पाटणकर, दिपकसिंह पाटणकर, सौ. रेखादेवी पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, सौ. ऐश्वर्यादेवी पाटणकर, अर्जुनसिंह पाटणकर, समरजीत पाटणकर, रघुवीर पाटणकर आदी कुटुंबीय हितचिंतक उपस्थित होते. ग्रामदेवतेचे दर्शन व देवदर्शन केल्यानंतर पाटण येथे विराट शक्ती प्रदर्शनाने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांचे मार्गदर्शनाखाली चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.