कराड दि. २५ :
समाजातील दुर्लक्षित दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल काम करत आहे. त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी कृष्णा हॉस्पिटलमार्फत दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे व साहित्याचे वाटप होत आहे. दिव्यांगांवर उपचार, तसेच त्यांचे मनौधर्य वाढविण्यासाठी येत्या काळात कराडमध्ये दिव्यांग सहाय्य संस्था सुरू करण्याचा मानस कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त ओंड (ता. कराड) येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा हॉस्पिटल आणि डॉ. अतुलबाबा युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा दिव्यांग मित्र योजना राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांची टीम तपासणी करत आहे. या तपासणीत आढळलेल्या गरजू दिव्यांगांना उपचार व कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कृत्रिम अवयव व साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम ओंड येथे पार पडला.
कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, की दिव्यांगांना जीवन जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत त्यांचे आई – वडिल मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे दिव्यांगांच्या आई-वडिलांचे विशेष कौतुक करायला हवे. येत्या काळात दिव्यांगांची नोंदणी करून, त्यांना लागेल ते सहकार्य तसेच कृत्रिम अवयव व साहित्य कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरविले जाणार आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की कृष्णा विश्व विद्यापीठाच्यावतीने संशोधनातून तयार केलेली कृत्रिम उपकरणे परिसरातील दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. आयुष्य जगण्याची दिव्यांगांची जिद्द वाखाणण्याजोगी असून, त्यांना दिलासा देण्यासाठी हे कृत्रिम अवयव व साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. येत्या काळात दिव्यांगांना कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्याची आम्ही सदैव तत्पर आहोत.
याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, सर्जेराव थोरात, व्ही. पी. थोरात, राजेंद्र थोरात, ॲड. अशोकराव थोरात, कृष्णत थोरात, प्रदीप थोरात, प्रल्हाद थोरात, प्रकाश थोरात, निवासराव गायकवाड, अरुण थोरात, अविनाश थोरात, प्रवीण थोरात, वैभव थोरात, संजय नवले, सतीश थोरवडे, पंकज पाटील, भरत थोरात, कृष्णत थोरात, कृष्णा फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ.गणेश थोरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पी. वाय. जाधव व वैभव थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सागर पवार यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र थोरात यांनी आभार मानले.